वॉशिंग्टन – अमेरिकेच्या सैनिकांना मारणारे दहशतवादी पाकिस्तान पोसत आहे, अशी जळजळीत टीका संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हेले यांनी केली आहे. “विथ ऑल डयू रेडबॅकः डिफेन्डिंग अमेरिका विथ ग्रिट एंड ग्रेस’ या आपल्या अलिकडील पुस्तकात त्यांनी हा आरोप केला आहे.
अमेरिकन मदतीचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता असूनही, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रामध्ये केवळ अमेरिकेविरूद्धच मतदान केले नाही तर दहशतवाद्यांना आश्रय देखील दिला, हे आपले निरीक्षण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कळवल्यावर ते अत्यंत अस्वस्थ झाले होते, असेही हेले यांनी या पुस्तकामध्ये लिहीले आहे.
आम्ही मुठभर देशांव्यतिरिक्त पाकिस्तानला अधिक मदत करतो. 2017 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या सैन्याला जवळपास 1 अब्ज डॉलर्सची मदत दिली. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानने आम्हाला 76 टक्के विरोधच केला आहे. एवढेच नव्हे तर सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. हे दहशतवादी अमेरिकन सैनिकांनाच ठार मारण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्षांना ही बाब समजल्यावरच त्यांनी पाकिस्तानचा मदत निधी रोखण्याबाबतचा निर्णय संसदेत घडवून आणला, असे हेले यांनी आपल्या ताज्या पुस्तकात लिहिले आहे.
मानवतावादी सहाय्य हे अमेरिकेसाठी नेहमीच प्राधान्याचे राहिले आहे. यापुढेही अमेरिका मानवतावादी कार्याला मदतच करत राहिल. जे देश स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अमेरिका प्रयत्न करणारच. मात्र आमच्या प्रामाणिकपणावर कायमच अवलंबून राहणाऱ्यांना अमेरिका कधीही जवळपास फिरकू देणार नाही, असेही या पुस्तकात म्हटले आहे.