आगरतळा: त्रिपुरातील डाव्या पक्षाच्या सरकार मधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री बादल चौधरी यांना 630 कोटी रूपयांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणात आज अटक करण्यात आली. सोमवारी रात्री त्यांना आम्ही अटक केली अशी माहिती पश्चिम त्रिपुरा जिल्हा अधिक्षक माणिक दास यांनी दिली. गेल्या बुधवारी त्यांचा अटकपुर्व जामीन स्थानिक कोर्टाने रद्दबातल ठरवल्यानंतर ते फरारी झाले होते.
चौधरी हे माणिक सरकार यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते व ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचेही सदस्य आहेत. सध्या त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. या कथित घोटाळा प्रकरणात त्रिपुराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता सुनील भौमिक यांनाही अटक करण्यात आली आहे.