मिदनापूर – पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला रामराम ठोकणारे प्रभावी नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत अधिकारी भाजपवासी झाले. त्यांच्या समवेत विविध पक्षांच्या 9 आमदारांनी आणि एका खासदारानेही भाजपचा झेंडा हाती घेतला.
पश्चिम बंगालमध्ये चार ते पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच अधिकारी यांनी केलेला पक्षबदल तृणमूलसाठी मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. तृणमूलच्या नेतृत्वाशी बिनसल्याने अधिकारी नुकतेच त्या पक्षातून बाहेर पडले.
तृणमूलच्या सर्वेसर्वा असणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर त्या पक्षात सर्वांधिक जनाधार असणारे नेते अशी अधिकारी यांची ओळख होती. आता त्यांनी केलेल्या पक्षबदलामुळे भाजपची राजकीय ताकद वाढणार आहे. अधिकारी यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांत तृणमूलच्या 5 आमदारांचा आणि एका खासदाराचा समावेश आहे. तर, इतर चौघे डाव्या पक्षांचे आणि कॉंग्रेसचे आमदार आहेत.
तृणमूलमध्ये एकट्या ममताच राहतील-शहा
केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेत ममता आणि तृणमूलवर जोरदार टीकास्त्र सोडले. अनेक नेते एकापाठोपाठ एक करून तृणमूलमधून बाहेर पडत आहेत. ही तर केवळ सुरूवात आहे. निवडणुकीवेळी त्या पक्षात एकट्या ममताच राहतील.
बंगालच्या परिवर्तनासाठी जनता भाजपच्या पाठिशी उभी राहत आहे. आगामी निवडणुकीत 294 पैकी 200 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील. बंगालमधील पुढील सरकार भाजपचे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.