चेन्नई – सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश आणि विधी आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. ए. आर. लक्ष्मणन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 78 वर्षांचे होते. तिरुचिरापल्ली येथील रुग्णालयात काल रात्री 11.30 वाजता त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन कन्या आहेत.
बुधवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागल्यावर त्यांना करालकुडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तिरुचिरापल्ली येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ते कोसळले, असे त्यांचे चिरंजीव ए. आर. एल. सुंदरसन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दोनच दिवसांपूर्वी, 24 ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नी मीनाक्षी आची यांचे निधन झाले होते.
न्या. लक्ष्मणन यांनी मुल्लाइपेरियार धरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये तमिळनाडूची बाजू मांडली होती. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी तमिळनाडू सरकारच्या वतीने काही खटल्यांमध्ये न्यायालयात बाजू मांडली होती.
केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी पार पाडली होती. निवृत्तीनंतर ते विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्याचा निर्णय देणाऱ्या पीठाचे ते सदस्य होते.