मुंबई – भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे. एमएसके प्रसाद यांची मुदत संपल्याने आता या पदाचा कार्यभार जोशी यांच्या हाती येणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी जाहीर केले.
BCCI announces Mr. Sunil Joshi and Mr. Harvinder Singh as members of the All-India Senior Selection Committee (Men).
More details ?
— BCCI (@BCCI) March 4, 2020
मंडळाने निवड समिती अध्यक्ष निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने जोशी यांचेच नाव निश्चित केले होते, त्यावर मंडळाने शिक्कामोर्तब केले. अध्यक्षपदासाठी माजी कसोटीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन, राजेश चौहान, हरविंदर सिंग, वेंकटेश प्रसाद या पाच जणांच्या बुधवारी मुंबईत मुलाखती झाल्या. त्यात जोशी यांना अध्यक्षपदी तर गगन खोडा यांच्याजागी हरविंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.
येत्या 12 मार्चपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती भारतीय संघाची निवड करणार आहे.
भारतीय संघाकडून एक खेळाडू म्हणून जोशी यांनी 15 कसोटी तसेच 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 41 तर, एकदिवसीय सामन्यांत 69 बळी मिळविले आहेत.
आगरकर स्पर्धेतून बाहेर…
मंडळाने एमएसके प्रसाद यांची मुदत संपल्याने निवड समितीचा नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी अजित आगरकरचे नाव आघाडीवर होते. मात्र, काही दिवसांतच त्याच्या नावावर फुली मारत अन्य पाच जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.