सातारा – सातारा एमआयडीसी येथे वास्तव्यास असणारे माजी सैनिक संयज मारूती अहिरे (वय 47) यांचा शिडीवरुन पडून गुरुवारी मृत्यू झाला. दरम्यान, संजय अहिरे हे मुळचे पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथील आहेत.
अधिक माहिती अशी, माजी सैनिक संजय अहिरे हे नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडत होता. यावेळी त्यांच्या घराच्या छतामधून पाणी येत होते. त्यामुळे ते घरातूनच शिडीवर चढून गळत असणाऱ्या ठिकाणी सिमेंट लावत होते. यावेळी पाय घसरल्याने ते फरशीवर खाली पडले.
या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीचा त्यांचा मृत्यू झाला. संजय अहिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.