चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव सत्रात भाग घेतला आहे. मात्र, बेस्ट फिनिशर धोनीच्या फलंदाजीवर नियंत्रण आणत नवोदित हरीशंकर या गोलंदाजाने सध्या आपल्या भोवती चर्चेचे वलय निर्माण केले आहे. सराव सत्रात सातत्याने धोनीचा त्रिफळा उडवल्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
धोनीने आंतररष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा तेव्हा त्याला बाद करण्यासाठी जगभरातील प्रत्येक गोलंदाज प्रयत्नशील असायचा. मात्र, धोनीने सातत्याने असे प्रयत्न अपयशी ठरवले. आता आयपीएल पूर्वीच्या सराव सत्रात मात्र, हरीशंकरसमोर धोनीची डाळ शिजली नाही.
धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. चेन्नईचा संघ सध्या आयपीएलसाठी सराव सत्रात तयारी करत आहे. या तयारीचा भाग म्हणून सराव लढतीत धोनीचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात हरीशंकरने वारंवार धोनीचा त्रिफळा उद्ध्वस्त केल्याचे दिसून आले.
अत्यंत छोटा रनअप घेत हरीशंकर वेगवान गोलंदाजी करतो. त्याने टाकलेले चेंडू धोनीला उमगलेच नाहीत व त्याचा त्रिफळा उडाल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसून आले व त्यामुळे हरीशंकर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. हरीशंकर रेड्डीला चेन्नई संघाने 20 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.