शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना काही नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले असताना आता चक्क शिक्रापूर मध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या माजी सरपंचांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे नियमित कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना सुरवातीपासून गावातील काही पुढाऱ्यांनी कोरोनावर अटकाव आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे, मात्र शिक्रापूर येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना राबविणाऱ्या तसेच कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कार साठी पुढाकार घेणाऱ्या एका माजी सरपंचालाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
सदर सरपंच आणि काही कार्यकर्ते नुकतेच सहलीला गेले होते, त्यांनतर त्यांना काही त्रास जाणवू लागल्याने खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःची कोरोना तपासणी केली. यात माजी सरपंचांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सदर माजी सरपंच यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने सदर सरपंच राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला असून त्यांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र शिक्रापुरातील माजी सरपंच कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याने गावातील नागरिकांनी चांगला धसका घेतला आहे.