नारायणगाव(प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निखिल उर्फ सोन्या सुरेश गावडे (वय 28) युवकाचा आज (दि. 15 जुलै) आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात करोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले आहे. या युवकाला ६ जुलै रोजी लेण्याद्री येथील कोविंड केंद्रातून आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .परंतु उपचारादरम्यान या युवकाचे फुफ्फुस निकामी झाल्याने आज निधन झाले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिली.
या युवकाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील पाच जण करोना बाधित रुग्ण येथील लेण्याद्री कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. हा युवक पिंपळगावचा माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याच्या निधनाने पिंपळगाव गावावर शोककळा पसरली आहे. हा युवक वारूळवाडी येथे सध्या एका सोसायटीत राहत होता.
या युवकाच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आदी नेत्यांनी शोक संदेश देऊन हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ, वहिनी, चुलते असा परिवार आहे.