बेंगळुरू – कर्नाटकचे माजी रणजीपटू जे. अरुण कुमार यांची अमेरिका क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते केवळ रणजीपटू म्हणून नव्हे तर एक यशस्वी प्रशिक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
कर्नाटककडून रणजी स्पर्धेत सरस कामगिरी केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली व स्वतःची अकादमीही सुरू केली. त्यांनी कर्नाटक रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. तसेच आयपीएल स्पर्धेतही त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. अमेरिका क्रिकेट मंडळ स्थापन होऊन अनेक वर्षे झालेली असली तरीही त्यांनी आयसीसीच्या सहयोगी देशांप्रमाणे पात्रता स्पर्धेतून अद्याप आपला ठसा उमटवलेला नाही. तसेच संघटनेतील काही समस्यांमुळे संघटनेवर आयसीसीने काही निर्बंधही लावले होते.
आता सर्व काही सुरळीत झाल्यानंतर तिथे पुन्हा एकदा क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारत, पाकिस्तानच्या नागरिकांमुळे तिथे क्रिकेटची लोकप्रियताही वाढत आहे. त्यामुळेच खूप काळाचा अनुभव पाहुन अरुण कुमार यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक क्रिकेटमधील प्रस्थापित संघाचा प्रवास पाहिला तर अमेरिकेतील क्रिकेट सध्या बाल्यावस्थेच असून आयसीसीच्या पात्रता स्पर्धेत यशस्वी कामगिरी व्हावी यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या जगभरात करोनाचा कहर सुरू आहे. अमेरिकेत तर काही प्रांतात भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे हा धोका कमी झाला किंवा पूर्णपणे नियंत्रित झाला की अरुण कुमार अमेरिकेला रवाना होतील. सुरुवातीला सराव सत्र, खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण या माध्यमातून त्यांचे काम सुरू होईल व त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील क्रिकेटचे व्यवस्थापन मार्गी लागेल, असा विश्वास अमेरिका क्रिकेट संघटनेने व्यक्त केला आहे.