चंडिगढ – पंजाबमधील माजी मंत्री मदनमोहन मित्तल यांनी शनिवारी शिरोमणी अकाली दलात (एसएडी) प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपला हादरा बसला.
आनंदपूर साहिब मतदारसंघातून मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देण्यास मित्तल प्रयत्नशील होते. मात्र, मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मित्तल यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यांनी एसएडीचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या उपस्थितीत त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
त्यानंतर त्यांची लगेचच एसएडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, मित्तल यांच्या मुलाची उमेदवारी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) इच्छेवर अवलंबून असल्याचे बादल यांनी स्पष्ट केले.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी एसएडी आणि बसपमध्ये युती झाली आहे. त्यांच्यातील जागावाटपानुसार आनंदपूर साहिब मतदारसंघ बसपच्या वाट्याला गेला आहे. त्या मतदारसंघातील उमेदवार बसपने याआधीच जाहीर केला आहे.
त्यामुळे बसपने आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली तरच मित्तलपुत्र रिंगणात उतरू शकेल. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्यातील 97 जागा एसएडी, तर 20 जागा बसप लढवणार आहे.