चंडिगढ -पंजाब दक्षता विभागाने मंगळवारी माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते साधूसिंग धरमसोत यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली. त्यामुळे कॉंग्रेस आणि सत्तारूढ आपमधील राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
पंजाबमध्ये कॉंग्रेसच्या सत्ताकाळात ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग मुख्यमंत्रिपदी असताना धरमसोत मंत्री म्हणून समाजकल्याण आणि वन खात्यांची जबाबदारी सांभाळत होते. आता पंजाबमधील सत्ताबदलानंतर वन खात्यातील भ्रष्टाचाराबद्दल धरमसोत यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकारण तापले आहे.
राजकीय सुडातून ती कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत कॉंग्रेसने आप आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीकास्त्र सोडले. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभूत करून आपने त्या राज्याची सत्ता मिळवली.
निवडणुकीतील प्रचारात आपने भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनवला. पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आपने भ्रष्टाचाराविरोधात कठोर पाऊले उचलण्याची ग्वाही दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर, एका माजी मंत्र्याच्या अटकेचे महत्व वाढले आहे. मात्र, ती कारवाई राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे.