नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने माहिती दिली आहे.
गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तिच्या वकिलाने सांगितले आहे. नलिनीचे तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झाले होते. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेले होते. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वकिलाने सांगितले आहे. यावेळी त्यांनी यामागील खरं कारण समोर आले पाहिजे अशी मागणीही केली आहे.
दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवले जावे अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.