कर्तारपूर कॉरिडॉरचे इम्रान यांच्या हस्ते उद्घाटन
कर्तारपूर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते शनिवारी ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडॉरचे औपचारिक उद्धाटन झाले. त्या कॉरिडॉरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत मोठी सुधारणा होण्यास हातभार लागेल, असा विश्वास भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानमधील गुरूद्वारा दरबार साहिबमध्ये पोहचण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉरचा उपयोग होणार आहे. त्या कॉरिडॉरमुळे भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानात विनाव्हिसा प्रवेश मिळणार आहे. कॉरिडॉरच्या उद्धाटनासाठी सुमारे 12 हजार भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी कॉरिडॉरमधून पाकिस्तानला पोहचली.
त्या तुकडीचे स्वागत इम्रान यांनी केले. त्या तुकडीमध्ये मनमोहन, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, कॉंग्रेसचे नेते असणारे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू आणि भाजपचे खासदार असणारे अभिनेते सनी देओल यांचाही समावेश होता. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यादरम्यान पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना मनमोहन यांनी कॉरिडॉर खुला करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा अतिशय मोठा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.