मुंबई : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते.आज सकाळी उपचारादरम्यान 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे प्रथम महापौर आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते. तसेच ते विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्य असलेले डॉ. शेखावत हे १९८५ मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून निवडून आले होते. ते १९९१ मध्ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले.
१९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ७ जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील हे विवाहबद्ध झाले होते. अनेक दशके ते अमरावतीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्याला होते.