कोलंबो – श्रीलंकेतून पळून गेलेले माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी अमेरिकेत आश्रय घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकन सरकारकडे ग्रीन कार्ड मिळवण्याचा अर्ज केला आहे. गेल्या जुलै महिन्यात ते श्रीलंकेतून कुटुंबीयांसहू पळून गेले होते. या आधी त्यांच्यावतीने असे जाहीर करण्यात आले होते की ते 24 ऑगस्ट रोजी श्रीलंकेत परत येणार आहेत.
तथापि, त्यापूर्वी त्यांची योजना नोव्हेंबरपर्यंत थायलंडमध्ये राहण्याची होती. ती योजना त्यांनी रद्द केली आहे असे सांगण्यात येत होते. आता त्यांनी अमेरिकन ग्रीन कार्डासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे ते 24 ऑगस्ट रोजी श्रीलंकेत येतील की नाही या विषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील राजपक्षे यांच्या वकिलांनी त्यांच्या पत्नी इओमा राजपक्षे या अमेरिकन नागरिक असल्यामुळे अर्ज करण्यास पात्र असल्याने ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी त्यांच्या अर्जाची प्रक्रिया मागील महिन्यातच सुरू केली असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेमध्ये कोलंबोमधील त्याच्या वकिलांना अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सिंगापुरातील महिनाभराच्या मुक्कामानंतर 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी गोटाबाया राजपक्षे थायलंडला पोहोचले. मालदीव नंतर थायलंड हा दुसरा आग्नेय आशियाई देश होता ज्यात राजपक्षे यांनी आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला होता.