वेलिंग्टन – न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. आता त्याने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
ख्रिस नैसर्गिक श्वासोच्छ्वास घेऊ लागल्याने आता लाईफ सपोर्ट सिस्टिम काढून टाकण्यात आली आहे. ख्रिस गेल्या काही वर्षांपासून पत्नी आणि मुलांसोबत ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राहात आहे.
ख्रिसच्या हृदयातील एका धमणीमध्ये ब्लॉकेज असल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. त्यावेळी त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला कृत्रिम लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. त्याच्या मुख्य धमणीलाही इजा झाली होती.
दरम्यान, त्याने न्यूझीलंडकडून 62 कसोटी आणि 215 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने दोन टी-20 सामनेही खेळले आहेत. निवृत्तीनंतर त्याने समाचोलक म्हणूनही काही काळ काम केले. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचेही आरोपही झाले होते. मात्र, त्यात न्यायालयाने त्याला क्लीनचिटही देण्यात आली होती.