राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा करोनाने मृत्यू

सोलापूर: सोलापूरमध्ये एका माजी आमदाराचा करोना संसर्ग झाल्यामुळे बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार युनूस शेख यांचा शनिवारीच (13 जून) करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा करोना विरोधातील लढा अपयशी ठरला आणि त्यांचा आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालच त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

युनूस भाई शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार होते. शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू मानले जात. युनूस शेख 1969, 1975 आणि 1985 अशा तीन टर्मला सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना महापौर पदासाठी संधी दिली. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 1990 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात 4 मुले, 3 मुली असा परिवार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.