मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हेदेखील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या अधिकृत घोषणेपूर्वीच पांडे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घोषणा केली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी याची घोषणा केली.
काय लिहिले पोस्टमध्ये?
दरम्यान ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत सवाल असताना त्यांनी कोणत्याही पक्षासोबत नसल्याचं स्पष्ट केलं. रविवारी संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक होतं प्रचाराला सुरूवात केली आहे. संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”
‘या’ प्रकरणात झाली होती अटक
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केलेली. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.