शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे ट्विट करणे चांगलेच महागात पडले आहे. आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची पक्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ३९ आमदारांचे समर्थन मिळवले. गुवाहाटीला आमदारांना घेऊन गेल्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिल. बंड यशस्वी करत शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला होता, यातच आढळराव पाटील यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचे ट्विट केले.
विशेष म्हणजे ट्विट केलेल्या फोटोमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे अशा कोणत्याही नेत्याचा फोटो दिसला नव्हता. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे हॅट्रिक विजेते खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@ShivajiAdhalrao) July 1, 2022
पुढे भविष्य काय ?
पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आता आढळराव पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. शिंदे यांच्या सोबत गेले तरी आढळरावाना लोकसभेसाठी पक्षाची निवड करणे गरजेचे आहे. अशात भाजपचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे आता ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.