शशिकांत भालेकर
अंतर्गत मतभेदामुळे राष्ट्रवादीची सभापतिपदाची बेरीज चुकली
पारनेर – पारनेर पंचायत समितीमध्ये माजी आमदार विजय औटी यांनी शिवसेनेचे गणेश शेळके यांच्या रूपाने आपल्या पक्षाचा सभापती करून नुकताच विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना धक्का दिला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता समीकरणे जुळण्या सारखी असताना त्यांना उपसभापतिपदावर समाधान मानावे लागले.
पंचायत समितीवर पुन्हा शिवसेनेने बाजी मारत गणेश शेळके दुसऱ्यांदा सभापती झाले. सभापती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे चार सदस्य होते. त्यातील एक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे गटाचा असल्याने त्याने यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र तरीही राष्ट्रवादीकडे तीन सदस्य होते व शिवसेनेच्या ताराबाई वाघ या राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्या होत्या.
कॉंग्रेसचे राहुल झावरे हे राष्ट्रवादीबरोबर होते. दिनेश बाबर देखील राष्ट्रवादीबरोबर होते व राष्ट्रवादीकडे पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार दीपक पवार यांच्याकडे असल्याने चारही सदस्य व्हीपनुसार मतदान करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीची एकूण संख्या ही सहा ते सात होत होती. बहुमतासाठी हा आकडा पुरेसा होता. मात्र एवढे असूनही आमदार लंके यांना चेकमेट करण्यात माजी आमदार विजय औटी व सभापती गणेश शेळके हे यशस्वी ठरले.
राष्ट्रवादीकडे पुरेसे बळ असतानाही सत्ता समीकरणातआ. लंके यांना उपसभापतिपदासाठी तडजोडी कराव्या लागल्या, यामागे राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी असल्याचे बोलले जात आहे. सुजित झावरे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे दोन सदस्य राष्ट्रवादीच्या विरोधात सभापतिपदासाठी मतदान करतील, अशी शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीचे नेते मधुकर उचाळे यांचे समर्थक रोहिणी काटे या राष्ट्रवादीबरोबर होत्या.
मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचे राजीनामा नाट्य व त्यानंतर जलद राजकीय घडामोडी घडल्याने उचाळे यांनी देखील आमदार लंके यांच्यावर असणारी नाराजी सभापती निवडीत काढण्याचा प्रयत्न केला व काटे या सेनेच्या गोटात सामील झाल्या. शेळके यांनी त्यांच्यासह शिवसेनेचे तीन सदस्य व साळवे, काटे, बाबर यांना बरोबर घेत बेरीज जुळवण्यास सुरुवात केली. त्यात ते यशस्वी झाले.
राहुल झावरे यांच्यामुळे बाबर यांची संधी हुकली
मागील निवडणुकीत बाबर यांच्यामुळे राहुल झावरे यांना सभापतिपदापर्यंत पोहोचण्यास मदत झाली होती. कॉंग्रेसचे दोन सदस्य असताना सभापतिपदी झावरे यांची वर्णी लागली होती. मात्र यावेळेस बाबर हे उपसभापती निवडीला उभे राहिल्यानंतर झावरे यांनी बाबर यांच्या विरोधात मतदान केले. विखे यांना माणनारे दोन्ही सदस्य या निवडणुकीत मात्र वेगळे झाले. राहुल झावरे यांनी राष्ट्रवादीच्या बाजूने, तर दिनेश बाबर यांनी शिवसेनेला साथ दिली.
विखे यांचा आदेश डावलत झावरे यांनी राष्ट्रवादीला मदत केले असल्याचे बोलले जात आहे. विखे यांनी उपसभापती पदासाठी बाबर यांचे नावे निश्चित केले होते. पराभव झाल्यानंतर शिवसेनेकडे तालुक्यात एकही सत्ताकेंद्र उरले नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली होती. पंचायत समिती निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात होती व यात शिवसेनेने विजय मिळवल्याने सेनेकडे आमदारांनंतरचे दुसरे महत्त्वाचे पद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शिवसेनेला होणार फायदा
पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असल्याने या वर्षांमध्ये तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तसेच महत्त्वाची मानली जाणारी पारनेरची नगरपंचायत निवडणूक याच वर्षी आहे. सभापतीनिवडीमुळे या निवडणुकांत शिवसेनेला फायदा होणार असून, आ. लंके यांनी विधानसभेला एक हाती मिळवलेल्या विजयाला हा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या विजयाचा फायदा शिवसेना येत्या निवडणुकीत उचलू शकते.