ट्रम्प यांच्यावर आणखी एका महिलेचा आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित व्यभिचारी वृत्तीकडे बोट दाखवणारा आणखी एक आरोप त्यांच्यावर एका महिलेने केला आहे. संबंधित महिला पूर्वाश्रमीची मॉडेल असून ती 24 वर्षांची असताना ट्रम्प यांनी तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप एका प्रख्यात दैनिकाशी बोलताना तिने केला आहे.

ऍमी डोरिस असे तिचे नाव असून ब्रिटनच्या द गार्डीयनला दिलेल्या मुलाखतीत तिने त्या दिवशी घडलेल्या घटनेचे सविस्तर कथन केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार संबंधित घटना 1997 मध्ये घडली. त्यावेळी यूएस  ओपन टेनीस टुर्नामेंट सुरू होती. तेव्हा ट्रम्प यांच्या व्हिआयपी सुटमध्ये ट्रम्प यांनी मर्यादांचे उल्लंघन करत त्यांच्याशी अत्यंत निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे लगट करण्याचा प्रयत्न केला.

प्रख्यात स्तंभलेखिका इ जीन कॅरोल यांनीही काही काळापूर्वी ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ट्रम्प यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही घटनाही 1990 च्या दशकात घडली होती.

दरम्यान, आपल्या प्रसिध्दीमुळे कोणत्याही महिलेशी अशा प्रकारची वर्तणूक करण्याचा आणि स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार मिळतो असे खुद्द ट्रम्प यांच्या आवाजातील रेकार्डींग 2016 च्या निवडणुकीपूर्वी समोर आले होते. ट्रम्प यांनी त्याचा इन्कार केला होता. नंतर मात्र त्यांनी ते रेकॉर्डींग खरे असल्याचे नमूद करत माफीही मागितली होती.

त्यानंतरही त्यांच्यावर महिलांसोबत गैरवर्तन आणि अतिप्रसंग करण्याचे अनेक आरोप झाले आहेत. मात्र हे सगळेच आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेत आता नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले असताना त्यांच्यावर आरोप होत असल्यामुळे त्याचा त्यांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

डोरिस यांचे आरोपही ट्रम्प यांच्या वकिलांनी फेटाळले आहेत. तसेच तुम्ही आता इतक्‍या वर्षांनी हे आरोप का करत आहात, असे डोरिस यांना विचारले असता त्या प्रसंगाच्या कटू स्मृतीतून आपल्याला बाहेर पडायचे होते. शिवाय आपल्या दोन किशोरवयीन मुलींसाठी आपल्याला रोल मॉडेल व्हायचे असल्याचे उत्तर डोरिस यांनी दिले.

वर्षभरापूर्वीच आपण संबंधित दैनिकाला ही मुलाखत दिली होती. मात्र ती प्रसिध्द न करण्यास त्यांना सांगितले होते, असेही त्यांनी नमूद केले. तसेच ती घटना घडल्यावर तुम्ही ट्रम्प यांच्यासोबत काय करत होतात, असे विचारल्यावर डोरिस म्हणाल्या की ती वेळ अशी असते की तुम्ही गोंधळून गोठल्यासारखे झालेले असतात. त्यावेळी काय करावे हे सूचत नसते.

दरम्यान, सदर घटना घडली त्यावेळी डोरिस यांनी याबाबत सांगितले होते, अशा शब्दांत काही लोकांनी डोरिस यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.