मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सरकारमध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी -माजी नेत्यांची रीघ लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अनेकांचे प्रवेश झालेले आहेत. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट आज मंगळवारी (दि.१८) भाजपात मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सिताराम घनदाट याच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाला परभणी जिल्ह्यात मोठं बळ मिळणार आहे. दुसरीकडे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रासपचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचे मात्र टेन्शन वाढणार आहे. तीन वेळा आमदार असलेल्या घनदाट यांनी अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं जाळे निर्माण केले आहे. आज सिताराम धनदाट यांच्यासोबत आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.
मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्वातील घनदाट हे १९९४ ते ९९ तत्कालीन महायुती शासन व महाविकास आघाडी (१९९९-०४, २००९-१४) काळात अपक्ष आमदार होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी व सध्या मुंबईत स्थित घनदाट यांनी १९८९ मधिल विधानसभा निवडणुकीत राखीव या मतदारसंघात भाजपाच्या वतीने पहिली निवडणूक लढविली व नंतर मित्रमंडळाचे जाळे तयार करून दोनवेळा २००९ मध्ये निवडणुकीत आरक्षण उठविल्यानंतरही अपक्ष आमदार राहिले.
तत्कालीन राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनाही घनदाट यांनी धूळ चारली होती. १९८९-१४ मध्ये त्यांनी एकवेळा भाजपा तर पाचवेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यात तीनवेळा आमदार झाले. २०१९-२४ च्या निवडणुकीत त्यांचा करिष्मा संपत आला व अपक्ष घनदाटांनी २०२४ च्या विधानसभा निवडणूक पूर्वकाळात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. परंतु मविआतून शिवसेना उबाठाला जागा गेल्याने त्यांनी वंचित आघाडीची कास धरत शेवटचे प्रयत्न केले. परंतु मतदारांनी तेथेही नाकारले. राजकीय अपयश, वाढते वय व त्यांच्या ताब्यातील अभ्युदय बँकेवरील ससेमिरा अशा विविध कारणांमुळे घनदाट हे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.