माजी आमदार प्रभाकर घार्गे वाढदिवस विशेष

असामान्य नेतृत्व

सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार व सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांचा वाढदिवस आज (बुधवार, दि. 18) साजरा होत आहे. उद्योग, व्यवसाय, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात भरारी घेतलेल्या या नेतृत्वाने नेहमीच दूरदृष्टी दाखवली आहे. सर्व व्याप सांभाळताना खटाव तालुक्‍याचे अस्तित्व रहावे म्हणून कायम धडपड करणाऱ्या या असामान्य नेतृत्वाबद्दल…!

माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जन्म पळशी येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बी. एससी. पर्यंत झाले. त्यांना मुळातच शेतीची आवड आहे. सुदैवाने माजी आमदार कै. केशवराव पाटील यांच्याशी नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व आकार घेऊ लागले. घार्गे हे गेली 12 वर्ष जिल्हा बॅंकेत संचालक आहेत. या कालावधीत त्यांनी तालुक्‍यातील बहुतांशी विकास सोसायट्या अनिष्ट तफावतीतून बाहेर काढल्या.

ग्रीनहाऊस उभारणी, फळबाग लागवड, वाहन खरेदी यासारखी मोठी कर्ज प्रकरणे करून देऊन या संस्थांची उलाढाल वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अवसायनात निघण्याच्या स्थितीत असलेल्या खटाव तालुका खरेदी-विक्री संघास त्यांनी नवसंजीवनी दिली आहे. या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दरात खते, बियाणे, शेतीच्या साहित्याचे वाटप केले आहे. तालुक्‍यातील बटाटा व इतर खरीप पिकांच्या साठवणुकीसाठी त्यांनी गोविंद कोल्ड स्टोअरेज हा अडचणीत आलेला प्रकल्प स्वतःच्या ताब्यात घेऊन यशस्वीपणे चालविला आहे. हिंगणेच्या माळावरील इथेनॉल प्रकल्प यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

सर्व सत्तास्थाने ताब्यात ठेवणारा नेता
घार्गेसाहेबांच्या नेतृत्वामुळे तालुक्‍यातील पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, वडूज नगरपंचायत, जिल्हा बॅंक या सर्व महत्त्वाच्या सत्तास्थानांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सत्तेतील पदावर बसविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पंचायत समितीत त्यांनी कार्यकर्त्याना सभापती, उपसभापतिपदावर बिनविरोध काम करण्याची संधी दिली आहे. बाजार समितीतही त्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक कारभार सुरू आहे. वडूजच्या नगराध्यक्षांना घार्गे यांनीच जिल्हा नियोजन समितीवर संधी दिल्याने तालुक्‍याच्या मुख्यालयात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.

हक्‍काच्या साखर कारखान्याची निर्मिती
केवळ शासकीय योजनांमधून कामे झाली, म्हणजे तालुक्‍याचा सर्वांगीण विकास झाला, असे होत नाही, याची जाणीव घार्गेसाहेबांना आहे. त्यांनी तालुक्‍याच्या औद्यागिक विकासाला महत्त्व दिले आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा हक्‍काचा साखर कारखाना असावा यासाठी त्यांनी पडळ येथील माळावर कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे व त्यांच्या बंधूंसह खटाव तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन खासगी खटाव-माण तालुका साखर कारखाना उभारला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्‍यांमधील शेकडो युवकांना रोजगार मिळाला आहे.

कारखान्याशी संलग्न वीज, इथेनॉल निर्मिती व स्टील प्लॅंट हे पूरक उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरात औद्यागिक क्रांतीची पहाट उगवणार आहे. औद्योगिक प्रगती घडवून आणताना पडळसारख्या खेड्याला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले तरी अपयशास न घाबरता त्यांनी जो येईल, त्याला बरोबर घेऊन दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. या कर्तबगार नेत्यास थेट जनतेतून संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांच्या हजारो हितचिंतकांची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी परमेश्‍वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे, हीच प्रार्थना!

– शब्दांकन –
महेश जाधव, मायणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)