राहुरी, (प्रतिनिधी)- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या राहुरी तालुक्यातील महिलेवरील अत्याचार प्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना गुरुवारी राहुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने मुरकुटे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यावर एका 35 वर्षीय महिलेने अनेक अमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून अटक करून चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात आणले. सोमवार दि. 8 रोजी मुरकुटेंना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दि. 10 रोजी मुरकुटे यांची पोलीस कोठडी संपल्याने राहुरी न्यायालयात हजर करणार होते. मुरकुटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांची पुण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्स यंत्रणेच्या माध्यमातून राहुरी न्यायालयात हजेरी दर्शवली.
न्यायालयात सरकारी पक्षाने मुरकुटेंच्या वैद्यकीय कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपींच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावर दोन्ही पक्षामध्ये जोरदार युक्तीवाद होऊन न्यायाधीश अदित्य शिंदे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवादानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपी भानुदास मुरकुटे यांच्यावतीने अॅड. महेश तवले, अॅड. सुमित पाटील, अॅड.सुभाष चौधरी, अॅड.उमेश लटमाळे, ऋषिकेश बोर्डे, अॅड. महेंद्र आढाव, अॅड.राहुल बारस्कर आदींनी काम पाहिले.
सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता अॅड. सविता गांधले व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बाजू मांडली. त्यानंतर मुरकुटेंच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयापुढे अर्ज ठेवला.