रायगड – महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन झाले. वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
माणिकराव जगताप हे कॉंग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती.
2004च्या विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील ते कॉंग्रेसचे एकमेव नेते होते. माणिकराव यांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा आहेत.
रायगड जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे माणिकराव जगताप यांच्या निधनाने कॉंग्रेसने एक धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला आहे, अशा शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. कॉंग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.