प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम
चिंबळी (वार्ताहर) – खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांना अभिप्रेत असलेली सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि खेडच्या विकासाला चालना देण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
माजी आमदार स्व. गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण (दि. 10) निमित्त चाकण येथे नेत्रतपासणी, दंततपासणी, हृदयविकार, कान, नाक, घसा, मधुमेह, रक्तदाब, हाडांची ठिसूळता, रक्ततपासणी अशा विविध आजारांसाठी महाआरोग्य शिबिरांचा औपचारीक शुभारंभ माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवेंद्र बुट्टेपाटील, हिरामण सातकर नानासाहेब टाकळकर, अनिल राधे आदींसह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांची सुरुवात स्व. गोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी करोनाकाळात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री शिंदे बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री तथा शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख माऊली कटके, सुलभा उबाळे, इरफान सय्यद, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, शिवाजी वर्षे, विजया शिंदे, महेश शेवकरी, विजयसिंह शिंदे, प्रकाश वाडेकर, सुरेश भोर, बाजार समितीचे संचालक पांडुरंग बनकर, अमर कांबळे, माजी सभापती काळुराम कड, कुरूळीचे उपसरपंच विशाल सोनवणे, चंदन मुऱ्हे, नितीन गायकवाड, केळगावचे माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, चिंबळीचे शाखा प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य काळुराम बनकर आदीसह नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व खेड तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले की, सरेश गोरे हे खेडमधील विविध विषय समस्या घेऊन सतत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत होते. त्यांच्या जाण्याने खेड तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. चाकण आणि राजगुरूनगर विकास आराखड्याच्या (डीपी) बाबत तातडीने काही निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.