महानगरपालिका अभियंत्यावर बूट फेक प्रकरण रा
ठोड स्वतःहून झाले तोफखाना पोलीस ठाण्यात हजर
नगर – महापालिकेच्या शहर अभियंत्यावर शिवसैनिकाने बूट फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिवसेना उपनेते व माजी आ.अनिल राठोड हे गुरुवारी (दि.1) रोजी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांकडून त्यांच्या अटकेची कार्यवाही करून त्यांना न्यायालयात हजर केले. राठोड यांनी दाखल केलेला जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र सायंकाळी राठोड यांचा अचानक बी.पी व शुगर वाढ्ल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी अनिल राठोडही तेथे गेले होते. आंदोलना दरम्यान, मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. याप्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन माजी आ. अनिल राठोड यांच्यासह शिवसेना नगरसेवक अशोक बडे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, नगरसेविका कमल सप्रे, रीटा भाकरे, मदन आढाव यांच्यासह 15 ते 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्यांना धमकावणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हे प्रकरण मे महिन्यात घडले होते. दरम्यान, राठोड यांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. या प्रकरणात राठोड हे आज दुपारी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या अटकेची कार्यवाही तोफखाना पोलिसांकडून करण्यात येवून न्यायालयात हजर करण्यात आले व त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्यांचा अचानक बी.पी वाढल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.