माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे निधन

औरंगाबाद  – नांदेडचे माजी खासदार, माजी राज्यमंत्री गंगाधरराव मोहनराव कुंटुरकर (वय 84) यांचे शनिवारी औरंगाबादेत निधन झाले. करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, पाच मुली, दोन मुलं, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शुक्रवारी मतदान झालेल्या नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे ते उमेदवार होते. 1996 ते 1998 या कालावधीत ते नांदेडचे खासदार होते. तर 1985 ते 1990 या काळात ते बिलोलीचे आमदार होते. याच काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद भूषवले होते.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते अशी गंगाधरराव कुंटुरकर यांची ओळख होती. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पद भूषवली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर कुंटुरकर यांचा अनेक वर्षे प्रभाव राहिलेला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीनंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. कुंटुरच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली होती. त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा बॅंकेचे संचालक व राज्य सहकारी बॅंकेचे संचालक माजी राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.