पुणे – महाराष्ट्राचे माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे (वय 58) यांचे आज मंगळवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनुराधा ढोबळे ह्या सावली वूमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा होत्या. तसेच शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक होत्या. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. स्त्रियांवरील सांसारिक ताण-तणआव कमी व्हावा यासाठी सावली फाउंडेशनद्वारे विविध उपक्रम राबवण्यात त्या पुढे होत्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील त्यांनी रोजगार महिलांसाठी खुप प्रयत्न केले.
अनुराधा ढोबळे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पती लक्ष्मणराव ढोबळे, मुलगा अभिजित, सून शारोन, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.