मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळणारे माजी मंत्री प्रा. जावेद खान यांचे आज मुंबईत निधन झाले. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जावेद खान यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते.
याबाबत मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांनी माहिती दिली. जुहु येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत प्रा. खान हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. 1985मध्ये ते पहिल्यांदा कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून गेले.
त्यानंतर 1990मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि सुधाकर राव नाईक यांच्या कार्यकाळात ते शिक्षण राज्यमंत्री आणि गृहनिर्माण व कामगार विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. काही वर्षांनंतर ते कॉंग्रेसपासून दूर गेले आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यानंतर 1999मध्ये सिडकोची अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पण 2004मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीत डावलण्यात आले. यानंतर 2012मध्ये मुंबई कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांनी त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील करून घेतले होते.