सोलापूर – माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अंगावर भर कार्यक्रमात शाई फेक करण्यात आली. सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटर सभागृहातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. हा प्रकार मयत भानुदास शिंदे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अशोक आणि सुरेखा लांबतुरे यांना पाठिशी घातल्याच्या निषेधार्थ केल्याचे समजते.
सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला. तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्या अंगावर काळी शाई टाकून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी स्टेजवर आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालत आहेत असे म्हणत आपला रोष सभागृहांमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सर्व समाजासमोर व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील यमाईदेवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता.
त्याचा राग मनात धरून अशोक लाबतुरे आणि त्यांच्या पत्नी सुरेखा लांबतुरे हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती.