बाजीराव दराडे विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर – सोशल मीडियावर महायुतीच्या उमेदवारास अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठिंबा दिल्याची खोटी बातमी प्रसारित केली. त्यावरून बाजीराव दराडे या व्यक्तीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार वाकचौरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
मतदानाच्या दिवशी सोमवारी बाजीराव दराडे नावाच्या व्यक्तीने एबीपी चॅनलच्या नावाने व्हॉट्सऍप ग्रुपवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा दिला, अशी खोटी बातमी प्रसारित केली. ही बातमी विनाकारण जाणूनबुजून टाकली. त्यामुळे सदर बातमी प्रसारित करणाऱ्या बाजीराव दराडे (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात हे करीत आहेत.