कोची – पलरीवेट्टम उड्डाणपूल घोटाळ्यात केरळचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व्ही. के. इब्राहिम कुंजू यांना अटक करण्यात आली.
दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ही कारवाई केली. ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची या वर्षी फेब्रुवारीत तीनदा चौकशी करण्यात आली होती.
कुंजू यांना अटक करण्यासाठी पथक जेव्हा त्यांच्या अलवा येथील निवासस्थानी पोहोचले, तेव्हा ते दोन दिवासांपासून रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात जाऊन अटकेची औपचारीकता पूर्ण करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल.
या घोटाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव टी. के. सूरज यांना यापुर्वी अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कुंजू यांनाही अटक करण्यात आली. कोचीतील पलरीवेट्टम उड्डाण पूल 2016 मध्ये 48 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आला. त्यात राजकीय नेते आणि नोकरशहांनी मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप होत होता.
त्या पुलाचे बांधणीचे नुकसान झाल्याने त्याची वर्षभरात फेर उभारणी करावी लागली होती. त्यानंतर गेल्या वर्षापासून हा पूल पुन्हा बंद असून त्याची दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत फेरउभारणी करण्याचे काम सुरू आहे.