झारखंडचे माजी मुख्यमंत्री कोडा निवडणूक रिंगणातून बाहेर

लढण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना आताची विधानसभा निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शवला. त्यामुळे कोडा यांना निवडणूक रिंगणातून बाहेरच रहावे लागणार आहे.

कोडा यांनी 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात विजयी होऊन ते खासदार बनले. मात्र, त्या निवडणुकीतील खर्चाचा तपशील न दिल्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला. त्यांना सप्टेंबर 2017 मध्ये तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले.

त्या निर्णयाविरोधात कोडा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सध्या झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती निवडणूक लढवण्यास कोडा उत्सुक होते. मात्र, न्यायालयाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाला नाही.

अपक्ष आमदार असतानाच कोडा यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यांनी ते पद 2006 ते 2008 या कालावधीसाठी भुषवले. विविध प्रकरणांवरून ते वादग्रस्त ठरले आहेत. त्यावरून त्यांना सर्वप्रथम 2009 मध्ये अटकही करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.