गुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसदाराची घोषणा केली. त्यांनी भारताचे माजी क्रिकेटर अजय जडेजा यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. अजय जडेजा हे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांच्या खूप जवळचा होते. त्यामुळे पुढील उत्तराधिकारी तेच होणार अशी चर्चा सुरु होती.
काय आहे राजघराण्याचा इतिहास ?
सध्याचे जाम साहेब शत्रुशल्य सिंह हे निपुत्रिक आहेत, त्यामुळे त्यांना आपला वारस निवडावा लागणार होता. तेव्हा दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी वारस म्हणून अजय जडेजाची निवड केली.शत्रुशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजय सिंह हे ३३ वर्षे जाम साहब होते. त्यांनाही चुलते रणजितसिंहजी यांनी दत्तक घेऊन वारस बनवलं होतं. जाम साहब रणजित सिंह यांच्याच नावाने रणजी ट्रॉफी खेळवली जाते. रणजित सिंहजी जडेजा हे भारताच्या स्वातंत्र्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये बेस्ट फलंदाज मानले जात होते.
अजय जडेजा हे नजित सिंह आणि दिलीप सिंह यांच्या कुटुंबातून असून त्यांची शुक्रवारी अधिकृतपणे वारस म्हणून घोषणा करण्यात आली. दिग्गज क्रिकेटर केएस रणजित सिंह हे 1907 ते 1933 पर्यंत नवानगरचे राज्यकर्ते होते. रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी रणजीत सिंग आणि केएस दिलीप सिंग यांच्या नावाने आयोजित केली जाते. शत्रुशल्य सिंह हे सुद्धा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते.
अजय जडेजा यांची कारकीर्द
अजय जडेजा हे भारतीय क्रिकेट टीममधील दिग्गज खेळाडू असून 1992 ते 2000 पर्यंत ते टीम इंडियाचा भाग होते. तसेच अजय जडेजा यांनी टीम इंडियाच्या उपकर्णधार जबाबदारी सुद्धा सांभाळली. भारतासाठी त्यांनी 15 टेस्ट आणि 196 वनडे सामने देखील खेळले. मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यावर त्यांच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. 2003 मध्ये दिल्ली हायकोर्टाने जडेजा यांच्यावरील बॅन हटवला होता.