गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

सुरत : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले आहे. आज सकाळी श्वसनाला त्रास जाणवू लागला. दरम्यान त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना अहमदाबादमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. केशुभाई पटेल हे 92 वर्षीय होते. महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. मात्र त्यावर त्यांनी अगदी यशस्वी मात केली होती.

दरम्यान, गुजरातच्या राजकीय पटलावरील केशुभाई पटेल हे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांनी गुजरात राज्याचे दोन वेळेस मुख्यमंत्री पद भुषवले आहे. गुजरातच्या ज्येष्ठ भाजप नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र 2012 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. पक्षत्यागानंतर त्यांनी गुजरात परिवर्तन पार्टी हा स्वतःचा नवा पक्ष सुरू केला होता. 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणूकीत ते विसावदर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले होते. मात्र दोन वर्षातच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

1995, 1998 साली केशुभाईंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2001 साली त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. जनसंघाच्या कार्यकाळातही त्यांनी पक्षासाठी मोलाचं काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केशुभाईंनी मोठा काळ काम केले आहे. मोदी देखील त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जरूर जात असे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.