इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे निधन

हेरगिरीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोसळले ; कैरोजवळ दफनविधी

नवी दिल्ली – इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे न्यायालयात सुनावणी दरम्यानच निधन झाले. त्यांच्यावरील हेरगिरीच्या आरोपांवर सुनावणी सुरु असताना ते अचानक बेशुद्ध झाले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती इजिप्तच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. आज कैरोच्या पूर्वेकडील मेदिनात नस्र येथील दफनभूमीमध्ये मोर्सी यांच्यावर दफनविधी करण्यात आले. याप्रसंगी मोर्सी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

2012 साली इजिप्तमध्ये क्रांती झाल्यानंतर मोर्सी इजिप्तचे अध्यक्ष झाले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते इजिप्तचे पहिले अध्यक्ष होते. हमास या दहशतवादी संघटनेसाठी हेरगिरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने त्यांना 5 मिनिटे आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली होती. याच दरम्यान आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले मोर्सी एकदम कोसळले आणि जागीच गतप्राण झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण 4 वाजून 5 मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ह्रदयविकाराचा तीव्र झटक्‍यामुळे मोर्सी यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे.

मोर्सी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले नसून पद्धतशीरपणे तुरुंगात त्यांची हत्याच करण्यात आली आहे, असा आरोप मुस्लिम ब्रदरहूड या पक्षाने केला आहे. “मोर्सी यांची तुरुंगात काळजी घेतली गेली नाही. ते आजारी असताना त्यांना औषधे देण्यात आली नाहीत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न त्यांना देण्यात आले. यामुळेच त्यांचा मृत्यू ओढवला असा आरोप मोर्सीं यांच्या “स्वातंत्र्य आणि न्याय’ पक्षाकडून करण्यात आला आहे, त्यामुळे इजिप्तमध्ये सध्या तणावपुर्ण शांतता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)