परागंदा कृष्णेच्या माजी संचालकाला दोघा मुलांसह डोंबिवलीत अटक

ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालत चार महिने होते फरारी

इस्लामपूर – पतसंस्थेतील ठेवी खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवून कोट्यवधींची फसवणूक करत चार महिने परागंदा असणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या माजी संचालकाला दोघा मुलांसह डोंबिवलीत अटक करण्यात आली आहे. आज तिघांना सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

जानेवारी महिन्यात सव्वाकोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार बोरगाव (ता.वाळवा) येथे घडल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मारुती उर्फ तात्या पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा संस्थापक व कृष्णा साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग उर्फ बाळनाना मारुती पाटील याच्यासह त्याच्या स्नेहलकुमार व जितेंद्र या दोन पुत्रांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

याबाबत संदीप शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे तिघेही परागंदा झाले होते. कोरोनाच्या परिस्थितीत लॉकडाऊन झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास थंडावला होता. याप्रकरणी ठेवीदारांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली होती. मागील चार दिवसांत जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित दळवी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक बनवले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके यांच्या पथकाने पाटील पिता-पुत्रांना पलावा सिटी-डोंबिवली ठाणे येथील एका अपार्टमेंट मध्ये छापा टाकून अटक केली. त्या तिघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्यांना आर्थिक गुन्हा शाखेने सांगली येथे तपास कामासाठी नेले आहे.

याबाबत माहिती अशी ; मानसींग पाटील हे कृष्णा कारखान्याचे माजी संचालक आहेत. त्याची बोरगाव येथे मारुती पाटील ग्रामीण शेती पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या खात्यावर ठेवलेली रक्कम २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवत पाटील कुटुंबीयांच्या युनिव्हर्सल बेवरेज खाजगी शुद्ध पाणी उद्योगात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पैसे बुडाले तर आमच्या जमिनी विकून तुमचे पैसे परत करू असा विश्वास दिला होता. अशाच प्रकारे अनेक ठेवीदारांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मार्च २०१८ सालापासून पाणी शुद्धीकरण व्यवसायासाठी नागरिकांनी पैसे गुंतवले होते. पतसंस्थे पेक्षा जादा व्याज आम्ही देणार आहोत.

पाणी शुद्धीकरण कंपनीचे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक मध्ये चांगले मार्केटिंग करत आहोत. या व्यवसायात आम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. पतसंस्थेतील पैसे युनिव्हर्सल बेवरेज या कंपनीत गुंतवा असे आमिष दाखवले. याला बळी पडत ३९ कुटुंबांनी घरातील ९६ सदस्यांच्या नावांवर पैसे गुंतवले आहेत. पैसे भरताना पाटील पिता पुत्रांनी संबंधित गुंतवणूकदारांना साध्या छापील ठेव पावतीवर रक्कम मिळाली. २४ टक्के व्याजा प्रमाणे ही रक्कम एक वर्षाने परत करू असा उल्लेख केलेला आहे.

पैसे गुंतवून मुदत संपलेल्या गुंतवणूकदारांनी संस्थेचे चेअरमन व संचालक असणाऱ्या पाटील पिता-पुत्राकडे पैसे देण्याचा तगादा लावला. मुदत संपली आहे आमचे पैसे परत द्या अशी मागणी केल्यावर मानसिंग पाटील त्यांचे पुत्र स्नेहल व जितेंद्र यांनी उद्योगासाठी आम्हाला फायनान्स कंपनीचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. पुन्हा काही महिन्यांनी हीच परिस्थिती राहीली. यावर गुंतवणूकदारांना युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत ठेव पावती वर वीस कोटी रुपयांचे कर्ज मिळालेचे बनावट मंजुरीचे पत्र दाखवले. यावर विश्वास ठेवून सर्व गुंतवणूकदार आशेवर होते. मात्र पावणे दोन वर्षे झाले तरी गुंतवलेल्या रक्कमा व त्यावरील व्याज मिळत नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा पाटील पिता-पुत्र कडे तगादा लावला. तेव्हा त्यांनी गुंतवणूकदारांना दमदाटीची भाषा वापरली.

पतसंस्थेत गुंतवलेल्या रक्कमेवर ज्यादा व्याजाचे आमिष दाखवत युनिव्हर्सल बेवरेज या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करून फसवणूक केली प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात मानसिंग उर्फ बाळ नाना पाटील त्याचे पुत्र स्नेहल व जितेंद्र पाटील यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत होते. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

परागंदा पाटील पिता-पुत्रांना अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान पखाली, पोलीस नाईक उदय घाडगे , दीपक रणखांबे, संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.

ज्यादा व्याजाचे अमिष; फसवणूकीचा आकडा मोठा…!

मारुती उर्फ तात्या पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत ज्यादा व्याज दर दिला जातो. याला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या होत्या. पतसंस्थेचे संस्थापक व कृष्णा साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग उर्फ बाळ नाना पाटील याच्या पाठीशी राजकीय वलय असल्याने तब्बल पावणे दोन वर्षांनी फसवणूक प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने दहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. एका एका कुटुंबाचे तब्बल २०-२० लाख रुपयांपर्यंत ठेवी आहेत. माजी संचालकाच्या कारनाम्यात त्याच्या स्नेहलकुमार व जितेंद्र या मुलांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. हे तिघेही चार महिने परागंदा होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.