नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं शनिवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. रविवारी सकाळी कॉंग्रेस मुख्यालयात शीला दीक्षित यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर रविवारी (ता.२१) दुपारी शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
Former Delhi Chief Minister and Congress leader Sheila Dikshit was cremated with state honours, today. pic.twitter.com/AXvidT6ubO
— ANI (@ANI) July 21, 2019
दरम्यान, दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची घोषणा केली.
दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. साल 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आल्या होत्या. परंतु 2013 साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.