मुंबई – मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळलेल्या रॉबीन मॉरिस याला आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचे बेटिंग केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. मॉरिससह आणखी दोन जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मॉरिसने 1995 ते 2007 या कालावधीत मुंबईकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळताना 44 सामन्यांत सहभाग घेतला होता. त्या काळी त्याच्या गुणवत्तेची मोठी चर्चाही झाली होती. आयपीएलला समांतर असलेली इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) जेव्हा सुरू झाली होती त्यावेळी मॉरिसनेही त्यात एका संघाकडून खेळ केला होता. ही स्पर्धा बंद पडल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळल्याचेही समोर आले होते.
गेल्या वर्षी एका व्यक्तीचे 2 लाख रुपयांसाठी अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्याच्यासह अन्य चार जणांना अटकही केली गेली होती. यावेळी त्याचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला होता, त्यात मॉरिस आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचे बेटिंग घेताना दिसला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझाही असल्याचे दिसून आले त्यामुळे मॉरिससह अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप व काही मोबाइल फोनही जप्त केले आहेत. अर्थात हा एका चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनदरम्यानचा प्रसंग असून तो खरा नाही व आपण बेटिंग करत नाही, असा खुलासा मॉरिसने केला आहे व आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.