मुंबईत माजी क्रिकेटपटू ‘माधव आपटे’ यांचे निधन

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू आणि माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी भारताकडून सात कसोटी सामने खेळले होते.

आपटे यांनी १९५२-५३ या काळात पाकिस्तानविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. यावेळी त्यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. केला. पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी १६३ धावांची केलेली खेळी गाजली होती. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही.

दरम्यान, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि मुंबईचे नगरपाल या दोन्ही पदावर त्यांनी काम केले होते. माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात “निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपल्या वडिलांना दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याची मागणी केली होती. वडिलांनी नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही,” असा गौप्यस्फोट आपटे यांनी केला होता.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातील गुरू अशीच त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. एका खेळाडू बरोबरच ते यशस्वी उद्योजक म्हणूनही परिचित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.