कचरा प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

पुणे- आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे(55,रा.आंबेगाव) व त्यांचा मुलगा कुणाल बेलदरे(35) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी अटक करुन शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटविल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी 15 ते 20 अज्ञात व्यक्तींविरोधात महापालिकेचे ठेकेदार मिलींद पवार(रा.हडपसर) यांनी तक्रार दाखल केली होती. प्रकल्पाला लागलेली आग सलग काही दिवस धुमसतच होती.

महापालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हटविण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हिसंक झालेल्या स्थानिक नागरिकांच्या जमावाने तेथील कार्यालय आणी प्रकल्प पेटवून दिला होता. पवार यांनी दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर हल्ला केला. यामध्ये पवार यांचा जेसीबी आणी पोकलॅंड मशिनची तोडफोड केली. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.

दरम्यान शंकरराव बेलदरे यांना अटक केल्याचे वृत्त कळताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात जमले होते. त्यांनी बेलदरे यांची अटक बेकायदा असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी अटक कायद्यानूसारच केली असल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी इतरही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.