सातारा – माजी नगरसेवक विजयकुमार अजित काटवटे (वय 40, रा. रामाचा गोट, सातारा) यांनी सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट व्हायरल केल्याने पोलिसांनी त्यांना दि. 10 मेपर्यंत चार तालुक्यांमधून तडीपार केले आहे. शाहूपुरी पोलिसांच्या केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, विजय काटवटे यांनी मंगळवारी (दि. 3) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. याबाबतची माहिती समजल्यावर शाहूपुरी पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले. संबंधित पोस्टबाबत चौकशी केल्यानंतर, ती व्हायरल केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी सर्व खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. समाजात तेढ निर्माण होईल आणि व्हायरल झालेली पोस्ट आक्षेपार्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
याबाबत अहवाल तयार करून सीआरपीसी 144 प्रमाणे काटवटे यांना दि. 10 मेपर्यंत सातारा, जावळी, कोरेगाव, कराड या तालुक्यांमधून तडीपार करत असल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी कार्यवाही केल्यावर काटवटे सातारा सोडून इतरत्र निघून गेले. पोलीस निरीक्षक संजय पतंग यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनंजय कुंभार, विश्वनाथ मेचकर यांनी ही कारवाई केली.