पुणे – कॉंग्रेसच्या माजी आमदार लीलाताई मर्चंट यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीलाताई या कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. सेवादल सैनिक म्हणून त्यांनी अनेकवर्षे काम केले. 1962 ते 68 या काळात त्यांनी नगरसेविका म्हणून पुण्यात प्रतिनिधित्व केले आणि त्यावेळी भाई वैद्य, एस. एम. जोशी, निळुभाऊ लिमये यांच्याबरोबरीने काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कोयना भूकंप, 1972 चा दुष्काळ, तसेच याच काळात पुण्यात झालेल्या प्रमुख दंगलींच्या काळातील त्यांचे कार्य हे समाजाभिमुख होते. 1972 मध्ये कसबा मतदार संघातून निवडणूक लढवून त्या जिंकून आल्या होत्या.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अनेक वर्षे त्या सदस्य होत्या. कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत. वयाची 90 वी उलटली तरी कॉंग्रेस भवन येथील कार्यक्रमांना त्या नियमितपणे उपस्थिती दर्शवत असत. महाराष्ट्र प्रदेश स्वातंत्र्य सैनिक महासंघ या संस्थेच्या त्या संस्थापक होत्या.
विधानसभेत तसेच पुणे महापालिकेत तडफेने जनतेचे आणि महिला संबंधिचे प्रश्न मांडणाऱ्या त्या धडाडीच्या सदस्य होत्या. पुण्यात स्त्री संघटना औद्योगिक मंडळ, संयुक्त स्त्री संस्था, वनिता समाज मंडळ, पुणे महिला मंडळ आदी संस्थांवर त्या बरेच वर्षे कार्यरत होत्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये राजीव गांधी पुरस्कार, सामाजिक ऋषीतुल्य पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कारांसह अनेक सामाजिक, राजकीय पुरस्कारांचा समावेश आहे.
शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली
शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे लीलाताई मर्चंट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी श्रद्धांजलीचे वाचन केले. नीता रजपूत यांनी अनुमोदन दिले. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक अजित दरेकर, गोपाळ तिवारी, शेखर कपोते, रमेश अय्यर, उत्तम भूमकर, विवेक गुडमेटी, नाना भेगडे, पोपट पाटोळे आदी उपस्थित होते.