Uttar Pradesh News : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, त्यांच्या सोबत तब्बल ७२ नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये २४ माजी आमदारांचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी शनिवारी (ता. २४) आपल्या डझनभर सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी राजकीय नामुष्की मानली जात आहे. सलग अनेक निवडणुकांतील अपयशानंतर काँग्रेस उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशातच नसीमुद्दीन सिद्दीकी यांचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजीनामा देताना नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असली, तरी कोणत्याही वरिष्ठ नेत्यावर थेट गंभीर आरोप केलेले नाहीत. गेल्या काही काळापासून पक्षातील कार्यशैली आणि अंतर्गत परिस्थितीमुळे आपण अस्वस्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच संघटनेत आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाढत गेल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचंही त्यांनी सूचित केलं. आपल्या भावना व्यक्त करताना सिद्दीकी म्हणाले की, “जातीयवाद आणि सांप्रदायिकतेविरोधात आवाज उठवण्यासाठी मी सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये सहभागी झालो होतो. मात्र, अपेक्षित लढा लढता आला नाही, याची खंत आहे.” त्याचबरोबर, कोणत्याही काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात वैयक्तिक तक्रार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र ज्या उद्देशाने पक्षात प्रवेश केला, तो साध्य होत नसल्याची नाराजी त्यांनी उघडपणे मांडली आहे. आपल्या सोबत राजीनामा दिलेल्या सर्व नेत्यांशी पुढील वाटचालीबाबत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत जाणार, याबाबत सिद्दीकी यांनी सध्या स्पष्ट भूमिका घेतलेली नसली, तरी “जनतेच्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या घडामोडीमुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फाटाफुटीचा पक्षावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.