मुंबई – कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चेला आता पुन्हा उधाण आले आहे. याचे कारण भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच कृपाशंकर सिंह यांची ‘सदिच्छा भेट’ घेतली. आधीही कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीमुळे पुन्हा या चर्चंना उधाण आले आहे.
कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मंत्री होते. राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते आणि आमदार भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातच कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपशी वाढलेली उघड जवळीक सर्वश्रुत आहे. त्यातच कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि आता कृपाशंकर सिंह यांची भेट भाजप आमदार प्रसाद लाड यांनी घेतल्याने कॉंग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.