अकोला, दि. 29- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली, असा आरोप अकोल्यातील एक पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी केला आहे.
परमवीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमवीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्टसह विविध 22 कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका वेबसाइटने दिली आहे. घाडगे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.
विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमवीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.
त्यासोबतच परमवीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटले आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांसह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच परमवीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.
2015 ते 2018 या काळात घाडगे ठाणे पोलीस आयुक्तालयात पोसिंटगवर होते. त्याकाळात अनेक अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप करताना काही जणांच्या विरोधात तक्रार दाखल न करण्याच्या सूचना सिंग यांनीच आपल्याला दिल्या होत्या, असा घाडगे यांचा आरोप आहे.