मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच अनघा मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली. त्या 75 वर्षांच्या होत्या. अनघा जोशी यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.
अनघा जोशी यांचा मंगल हिगवे येथे 2 जानेवारी 1945 रोजी जन्म झाला. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी त्यांचा विवाह झाला. नोकरी सोडून मनोहर जोशी यांनी नुकतेच कोहिनूर क्लास सुरू केले होते. व्यवसायातले चढउतार, जोशी सरांच्या आणि राजकीय व सामाजिक जीवनातले यश यात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली.
मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरू झाली. 1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, मुख्यमंत्रिपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली.
शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-कॉंग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते.