माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली ; किडनी २५ टक्केच कार्यरत

नवी दिल्ली : बिहारमध्ये दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव, सुशील मोदी आणि चिराग पासवान यांनी आपल्या पक्षासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच स्तरातून एक्झिट पोल येत आहेत. एकीकडे बिहारचे राजकारण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

रांची येथील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव मानसिक तणावात गेले आहेत. तसेच मधुमेहाचा आजार असल्याने लालूंच्या क्रियेटनीन पातळीत अचानक वाढ झाली आहे.

रिम्समध्ये लालूंवर उपचार करत असलेल्या डॉ. उमेश प्रसाद यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्रियेटनीन पातळी अशीच वाढली तर लालूप्रसाद यादव यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता भासू शकते. याबाबतची माहिती हायकोर्टाला देण्यात आली आहे. हायकोर्टाने रिम्स प्रशासनाकडून लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याबाबत अहवाल मागवला होता.

लालू प्रसाद यादव जेव्हा रिम्समध्ये उपचारासाठी दाखल झाले होते तेव्हा त्यांची किडनी ३ बी स्टेजला होती. सध्या ती ४ बी स्टेजला पोहचली आहे. सध्या लालू यांची किडनी फक्त २५ टक्के काम करत आहे. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये १० टक्के घट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये आणखी घट झाल्यास त्यांना तातडीनं डायलिसीस करण्याची आवश्यकता भासू शकते, असे रिम्समध्यील तज्ज्ञांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.